Wednesday, 12 December 2012

रसरशित....


रसरशीत.....

आज फेब्रुवारीतील शेवटचा रविवार.औरंगाबादच्या मोंढयातील फळ, भाजीपाला,धान्य व तत्सम संसारी वस्तुंच्या आठवडी बाजाराचा दिवस!

कुठलाही... अगदी कुठलाही आठवडीबाजार म्हटला की माझ्या अंगात नवचैतन्यच संचारतं. कधी एकदा ह्या बाजारात जाऊन काही खरेदी करते व सगळा बाजार हिंडुन डोळे भरुन बघते असं मला होतं.
खुप म्हणजे अमाप... चैतन्याने रसरसलेला असतो हा आठवडी बाजार. मोठ्ठी मैदानासारखी चढऊताराची जागा,चहुबाजुने वेढणारा नाला,काठाकाठाने असलेली फुटकळ दुकानं....चिखल...वास...धुरळा...खकाणा...ऊन...विक्रेत्यांचे ओरडणे...घासाघीशीचे संवाद...गाडयांचे आवाज... स्त्री-पुरुषांची प्रचंड गर्दी.....अक्षरशः हरवुन व हरखुन जायला होतं!
मला हे सर्व मनापासुन फार आवडतं. infact it gives me a lot of creative energy ! हे लिखाण सुध्दा मी बाजारातुन आल्या आल्या लिहीत आहे, so you can imagine !
.
आवर्जून मी अश्या बाजारात नेहमी जात असते. गरज असो वा नसो २००/३०० रुपयांची खरेदी करतेच करते.भाजीपाला, फळे, नागली, बाजरी अशी धान्य, वेताच्या टोपल्या,पोळपाट-लाटणं,लोखंडी सांडश्या,सराटे,कुकर- कढयांचे साबण,बैलांच्या गळ्यातल्या पितळी घंटया ,लोटे, खुरपं अश्या अनेक वस्तु मला मोहात पाडतात.( नवर्‍याची गैस ऐजन्सी असल्यामुळे घरी स्टोव्ह नाही, नाहीतर स्टोव्हपिन सुध्दा आणली असती) पण ह्या वस्तुंपेक्षाही मला काय आवडत असेल तर इथली उत्साहानी रसरसलेली माणसं व खरेदी विक्रीचा हा अव्याहत वाहणारा संसारी प्रवाह!

माणसांनी व तजेलदार भाज्या-फळांनी ओसंडणा‍र्‍या  ह्या रंगीत बाजारात काय नसतं? एखाद्या व्यक्तीला जगायला जे काय म्हणुन गरजेच असतं ते सर्व इथे मिळतं.
सर्व प्रकारचा मोसमी भाजीपाला, फळे, धान्य,मसाले...ताजं- सुकं मांस, मटन...सर्व प्रकारचे कपडे,कुंकू,पावडर,बांगडया,आरसे,पर्सेस,चपला...लाकडी-लोखंडी हत्यारं... झाडू,टोपल्या...
पितळ,स्टील,अल्युमीनीयमची सर्व प्रकारची भांडी,डबे,कोठया,पेटया....चहा,भजी,चिवडा,शेव,मिठाया....अगदी जनावरं सुध्दा! बाजूच्या छोटया( चोर ?) दुकानांमधुन नवी जुनी लोखंडी-लाकडी कपाटं, पंखे,रेडीओ,खुर्च्या,स्टोव्ह्ज,म्युझिक सिस्टीम्स,हिटर्स सोबत घोडयांच्या,बैलांच्या नाला सुध्दा मिळतात....
काय मागाल ते इथे मिळते!

आसपासंच काही " नेमके" दवाखाने व सोनार असतात.एलोपथी व जडीबुटींची चलती असते.महागाईची कीतीही रड पेपरमधे वाचली तरी इथल्या सोनारांकडे पाय ठेवायला जागा नसते. मणी,वाटया,नथी,तीन थाळी झुमके, जोडवे,पैंजण एक ना अनेक दागीन्यांची बायका अगदी हीरीरीने तोड-मोड, घडण करत असतात. एखाद्या स्त्रीच्या चेहर्यावरील दागीनेखरेदीच्या  तॄप्तीचा आनंद केमेरयात टीपावा असा असतो.

हिन्दु-मुस्लीम, जात-पात,स्त्री-पुरुष हे सर्व भेद इथे धुरळ्याबरोबर उडून जातात.अतिशय एकोप्याने इथला व्यवहार चालु असतो ( काही अपवाद). सगळ्या विक्रेत्यांच्या जागा ठरलेल्या असतात.पंचक्रोशीतील बाया-बुवा मिळुन विक्रीसाठी येतात. दिवसभरात नोटा,चिल्लर,जेवण,चहा,हास्य-विनोद (भांडण सुध्दा) शेअर करत,एकमेकांना सांभाळत व्यापार करतात.९-१० वर्षांची मुलं ठोक धान्य विकतात,तरुण भाजीपाला विकतात,वयस्कर वेताचं सामान विकतात,गरोदर स्त्रीया कपडे विकतात, पण हे कुणीही, कधीही हरवल्यासारखे नसतात, एकटे नसतात. कुणीतरी दादा,बाबा,मामा,चाचा,अम्मी,बाळू ह्यांच्या मदतीला असतोचं असतो! ह्यांची सपोर्ट सिस्टीम बघून हायसं वाटतं.(नाही तर आपल्या मुंबईत पैश्याच्या लोभापायी कुणाचे गळे चिरले तरी घरातुन दुर्गंधी आल्याशिवाय शेजारयाला कळत नाही)

ह्या बाजारांच्या आसपास नेहमी छोटी छोटी घरं दाटीवाटीने असतात. हिन्दु- मुस्लीम गल्ल्यांमधुन सलोख्याने रहातात. इथल्या मुस्लीमांच्या बकरया व हिन्दुच्या गाई-म्हशी तर कायमच्या इथल्या भाजी- फळांच्या कचरयावरच पोसल्या जातात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी ह्या बकरया, गाई, म्हशी बाजु बाजुने सुखनैव चरत असतात. मास-मटनाच्या आसपास कुत्रे,कावळे,मांजरी,डुकरं येरझारा घालत असतात. लुळे-पांगळे, भिकारी मोक्यावर ऊभे राहून लोकांकडून फळं,फरसाण, पैसे पदरात पाडून घेत असतात. भामटे संधी शोधत सावध फिरत असतात. खास ठीकाणी छटेल बायका नट्टा-पट्टा करून ऊभ्या असतात. एखाद्या झाडाखाली कानातला मळ काढुन मिळतो, गुळगुळीत दाढी करून मिळते... थोडक्यात काय तर इथे कुणाचही कोणत्याही गोष्टीसाठी अडत नाही !


पंचक्रोशीतील आप्त इथेच एकमेकांना नियमीत भेटतात...शेव-चहा घेत सुख-दुःखाच्या गप्पा मारतात, लेकी-बाळींची बोलता बोलता लग्न ठरवतात,ठरवलेल्या लग्नाच्या पत्रीका वाटतात, तेराव्याचे आवतण देतात, नुकत्याच जन्मलेल्या नातवाचे पेढे-गोडीशेव देखील वाटतात......                                                                                
खरचं कीती लोभसं, मनोहारी व आशादायी आहे हे!
शहरांमधे एक समज आहे की (शहरात अपरीहार्य असलेला) एकटेपणा अथवा नैराश्य घालवायचं असेल तर एखादा पाळीव प्राणी कींवा फिश पोन्ड घरात ठेवावा असा...it acts like a therapy. मी तर म्हणते नुसतेच नैराश्य घालवायलाच नाही तर भरभरुन creative and positive energy मिळवायला आठवडी बाजारासारखं ठीकाण नाही! you are never alone and lonely here .

हिरवांगार भाजीपाला, रसदार मोसमी फळांचे ढीगच्या ढीग, पिवळया धम्मक शेवेनी व लालचुटुक गोडयाशेवेनी भरलेल्या मिठायांच्या राहुटया, लटकवलेल्या synthetic साडयांच्या पताका,जीव नकोसा करण्यार्या सुक्या मिर्च्यांचे ऐस- पैस ढीग, पागोटे, धोतर,बुरखे,ओढण्या, छत्र्या, म्हशी, बकर्या...इथलं सगळंच कसं photogenic असतं ! मलातर इथल्या visuals वर paintingsची सिरीज करावीशी वाटते.
i always miss my camera and sketch book here !

अश्या ह्या चैतन्यदायी बाजाराला व्यापुन काय उरत असेल तर विक्रेत्यांच्या आरोळ्या, काही इरसाल शिव्या...पोलिसांची शिट्टी, कोंबडयाची शेवटची आर्त हाक....आणि ग्राहकांची स्वस्त खरेदीची घासाघाशीची अहमीका ! life is so beautiful & complete here ! REALLY !

मी सर्वात मागे उभे राहुन भाजीवाल्यापेक्षा सहकारी ग्राहकालांच (म्हणजे गरीब व्यक्तीला) मालाचा भाव विचारते, नस्ता माझा तोंडवळा व वेषभुषा बघुन कुणीही मला योग्यदरात काही देत नाही. तरी सुध्दा कधी कधी माझी ही trick किंवा विक्रेत्याचा दुटप्पीपणा उघडा पडतोच ! मग मी सुध्दा " क्युं चाचा... हमने क्या गुनाह किया है, जो हमे महेंगा दे रहे हो ? असे म्हणुन चाचाला कानकोंड करते व हसत हसत वरचे २-४ रुपये सोडुन देते. लुटलो भाई ! १०-२० कीही तो बात है, और वैसे भी अपनोंसे लुट जाने का मजाही कुछ और है !
हिशेबाने म्हणाल तर मला इथे स्वस्त- बिस्त काही मिळत नाही, पण मी इथे येते तीच मुळी हा रसरसलेला बाजार बघण्यासाठी...अनुभवण्यासाठी...माझ्यात जिरवण्यासाठी !

No comments:

Post a Comment