दारासमोर घनदाट बिट्टीचं झाड आहे. तसंही आमच्या आसपास बरीच कोपऱ्यात असलेली अनडिस्टर्ब्ड झाडी आहे. बुलबुल, फुलचुखे आरामात घरं बांधतात, बाळांतपण उरकतात. त्यामुळे कोकीळ, भारद्वाज, मांजर कायमच आमच्या परिसरात दबा धरुन फिरताना दिसतात. बरेचदा कर्कश्य घमासान होतं. एखादं अंड गटकावलं जातं, एखादं कबुतर मटकावलं जातंच जातं.
आत्ताही सकाळी चहा घेत बसले तर झपकिनी एक कोकिळा बिट्टीच्या झाडावर आली. तक्षणी एक
बुलबुल कर..कर..कर..करत आला. झाडापासून जरा दूरच्या खांबावर बसला. मग झपाटल्यागत त्याने आपल्या भरारीने त्या कोकीळेला धक्का मारायचा प्रयत्न केला. जोडीदाराचा अलार्मिंग टाहो ऐकून बुलबलचा जोडीदार देखील हातातलं काम टाकून झपकिनी आला. एकूणच समर प्रसंग बघून तोही चिरकत चिरकत भरा-या मारत कोकिळेला धोस देऊ लागला. मग दुहेरी धोका समजून कोकिळही अजूनच अंतर्गत झाडीत घुसला. आता या बुलबुलांना भरा-या मारुन कोकिळेला पळवताही येईना. मग त्यांनी अजूनच चिर चिर आक्रंदन सुरु केले. पण हाताबाहेर गेलेली परिस्थिती हतबलतेने पहाण्या खेरीज ते काही करु शकत नव्हते. एव्हाना तो कोकिळ माझ्याही नजरेच्या टप्प्यातून दिसेनासा होत झाडीत गडप झाला.
बुलबुलांचा एकाकी आक्रोश आणि कोकिळेचं बेडर वर्तन... somehow I couldn't see it.
तशीच उठले.
माझी उठलेली मुर्ती बघून बुलबुल अजूनच कावले. एकापाठी एक दोन संकटं समोर उभी ठाकली. घरट्यातलं अंड वा बाळजीव आणि आता आपला जीव. सारासार बुद्धी वापरुन ते अजूनच उंचावरच्या लाईटच्या तारांवर तोल सांभाळत आता पुढे काय होतंय हे बघत व आवाज करत राहिले.
जवळचं पडलेली काठी मी उचलली आणि त्या झाडाला जरासे धक्के दिले. धोक्याची जाणीव होऊन त्या भुकेल्या कोकिळेने भर्रदिशी दूरवर सुंबाल्या केला.
धोका टळला याची पक्की खात्री झाली की वरच्यावरुनच बुलबुल जोडी भुर्रकन उडून सुप्रभातीच्या दाणापाण्याच्या कामाला लागली पण.
नजरेनी आणि कानांनी काही टिपायच्या वा फोटो काढायच्या फंदात न पडता नुसती एक काठी उचलून त्या कोकिळेला पळवून मी लावलं याचं मलाच बरं वाटलं.
परत आरामखुर्चीत येऊन बसले तर मनात विचार आला, आपण त्या कोकिळेला पळवलं हे बरोबर आहे का ? कदाचित तिही एक-दोन दिवसांची भुकेली असेल, पोटुशी असेल ? घरट्यात तिचीही पिल्लं आ वासून बसलेली असतील ?
कायमच सबलांसमोर दुर्बलांना झुकतं माप मिळतं नाही ? सबलांची भुक वा जीवन संघर्ष समजून घेण्यात आपण कमी पडतोय की काय ?
मुळातच जीवन साखळीत आपण सहेतुक आणि आपल्या समजुतीने दखल देतोय हेच मुळी चुकतंय का काय ?
जो तो आपापल्या ठिकाणी रफादफा झाला, पण मी मात्र विचारात हरवले.
No comments:
Post a Comment