पहिला कार्यक्रम सुरवातीचा म्हणून त्या मापदंडाने छान झाला.
तसचं दुस-या वर्षीच्या कार्यक्रमाचं सादरीकरण मस्तच झालं.
प्रशस्त लॉन्स,दोन्ही बाजूंनी डोंगर,तलावावरचा गारवा...सुंदर लाईटिंग...शहरातले संगीत क्षेत्रातले जाणकार..लोकप्रीय निवेदकाच खुसखुशीत निवेदन...रसिकां बरोबर कलावंतही प्रसन्न झाले.त्यामुळे तिस-या वर्षीचं नियोजन जरा सुटसुटीत झालं.कार्यक्रमाची किर्ती संगीत क्षेत्रात लगेच पसरते.दुर दुरच्या कलावंतांच्या फ्रेंड रिक्वेस्टस येतात.संवाद होतो.
मग आपोआपचं तुम्ही काय करायला पाहिजे हे तुम्हाला स्पष्ट होऊ लागतं.कार्यक्रमाला दिशा मिळत जाते.व्यक्तिशः तुम्हालाही आयोजक म्हणून खुप शिकायला मिळतं.
आपल्या मराठवाड्यातल्या नवोदित कलावंताला (इथे साधारण गायन किंवा तबला,बासरी असा लिमिटेड स्कोप आहे) व्यासपीठ देणे आणि सहसा औरंगाबादकरांना ऐकायला मिळत नाहीत अशी पारंपारीक भारतीय वाद्य आणि ते वाजवणारे कलावंत आवर्जून बोलावणे.अशा प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांना ऐकायची संधी शहरवासियांना मिळाली तर नक्कीच कार्यक्रम लोकप्रीय होईल याची खात्री पटली.
आणि मग शोध घेताना जलतरंगने लक्ष वेधून घेतले तसेच रुद्रवीणेने देखील.
मग जरा स्त्री आणि पुरुष कलावंताना मुद्दाम प्राधान्याने बोलवायच ठरवलं.स्त्री गायिका खूप आहेत पण वादिका त्यामानाने कमी आहेत हाही शोध लागला.
फोन नंबर मिळवून,संपर्क साधून कलावंत ठरले.माजलगावची कु. सुरेषा पोरे हिचं गायन.पुण्यातल्या श्री. मिलिंद तुळणकरांच जलतरंग आणि कर्नाटकातल्या सिरसी इथल्या श्रीमती ज्योती हेगडे यांच रुद्रवीणा वादन.
वेगळी,अनोखी वाद्य असल्यामुळे रसिकांत कमालीची उत्सुकता होतीच.कलावंतानीही त्याच यथोचित चिज केलं.
अपेक्षेप्रमाणे सुयोग्य गर्दी झाली.रम्य वातावरणात मैफिल रंगली.माझे शाळेतले बरेच मित्र सह कुटूंब आले.उस्फुर्तपणे त्यांनी मदत केली.काही व्यावसायिकांनी पण कार्यक्रमाचा हेतू बघून तत्परतेने मदत केली.पण दुष्काळाचं सावटंच इतकं भीषण होतं की इच्छा असूनही काही जणांना मदत करणं शक्य झालं नाही.असो.
एव्हाना गर्दी जमवण्याची माझीही धास्ती बरीच कमी झाली.
आलेला प्रत्येक जण संगीतात रमतोय,कार्यक्रमाची भरभरुन तारिफ करतोय.कलावंतही निसर्गरम्य वातावरणाला दाद देत तन्मयतेने कलेला चारचांद लावताहेत.
एक सुरेल मैफिल हिरण्यच्या मातीत फुलत आहे..परिसरात गुंजत आहे.
अजून काय हवं ?
No comments:
Post a Comment