Monday, 9 May 2016

अक्षय्य...



काल नवीन जागेतला पहिला social call..चैत्रगौरीचं हळदीकुंकू.. आवर्जून गेले..आया-बायांच्या ओळखी करून घेतल्या.. पोराटोरांशी मैत्रीतर कधीचीचं झालेली.
एकत्र कुटुंब.. टुमदार मध्यम बंगला..महिलामंडळाची जरतारी लगबग..चैत्रगौरीची प्रशस्त आरास मांडलेली.
अत्तर व भिजलेले चणे...बालपण आठवलं........

नांदेड आणी परिसर सोडून बाहेर पडलेलं आमचं कुटुंब पहिलं..ऊन्हाळा आला की नेमाने नांदेड, कंधार, वसमत,हिमायतनगर,बोधडी असल्या उतरत्या भाजणीच्या गावांत दौरे असायचे.छोटी..मराठवाडी वैराण गावं..दिवसभर हुंदडत व रात्री तारांगण बघत छान रमायचो आम्ही, पण सकाळी ती हागनदारी म्हटलं की नकोसं व्हायचं तरीपण नातलगांमुळे रहावसं वाटायचं.
माझ्या मावश्या,काक्वा मुद्दाम आमची शहरी फौज आल्यानंतरच चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठरवतं असतं. एक-दिड महिन्याच्या वास्तव्यात सगळ्यांमधे हळदीकुंकाचं टाईम टेबल वाटलं जायचं.
आईच्या माहेरी-सासरी सारखंच कौतुक,जिव्हाळा असायचा.
आमचं शहरी पाणी..सुस्थिती.. देखणेपण..स्टायलिश राहणं..चैत्रगौरीची कल्पक मांडणी करायची माझ्या आईची हातोटी..स्वभावातलं लाघव..अगदी चर्चेचा विषय असायचा.तमाम महिला आवर्जून हळदीकुंकवाला उपस्थित रहायच्या...आईचं कौतुक करायच्या. बहिणींमधेही व जावांमधेही सर्वात धाकटी होती माझी आई.
गोरीपान,उंच,रसरशीत..अंबाडा,गजरा,मोत्याचे दागिने, पटोला सिल्क साडी व कायम हसमुख...
जावा,नणंदा,बहिणी,भावजयांना फक्त अपार कौतुक आणी कौतुकंच ! मग मावश्या,माम्या,चुलत-मावस बहिणी आमचे इतर शहरी फेशनेबल कपडे घालुन, लेटेस्ट दागिने, क्लिपा,हेयर बेन्ड्स् वापरून गाववाल्यांपेक्षा एक से एक हटके दिसायच्या व भाव खाऊन जायच्या. मावश्या-काक्वांना तर आई म्हणेल ती पुर्व दिशा.

भुश्याला हिरवा रंग देऊन हिरवळ दाखवायची, सिरिंजने कारंज तर छोट्या मोटरवर धबधबा चालवला जायचा या चैत्रगौरीच्या आरासीत. आजच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही हिरवी-पाणीदार आठवणसुध्दा ह्रदयस्पर्शी वाटतीयं.
जे नसतं ते असावंस वाटणं असं कीती वाटतं असतं नाही आपल्याला.
सडा,रांगोळ्या,गजरे करणे, अत्तर व गुलाब पाणी शिंपडणे ही कामं आमची.
ई..शी...घाण...म्हणत शेणपाण्याचा सडा टाकायला मी हिमायत नगरलांच शिकले. आजही कुठेही पाणी शिंपडतांना मला हिमायत नगरचं घर-अंगण आठवतंच आठवतं.
अर्थात आम्ही गावी पोहोंचेपर्यंत मावस-चुलत बहिणी गावात हवा तयारंच करुन ठेवायच्या की आता आमची मावशी-काकू आली की बघा आम्ही कसं जोरदार करतो ते हळदीकुंकू ! त्यामुळे तमाम पोरीसोरी आवर्जून यायच्या व दिपून जायच्या.
Of course my mother used to be the star of the entire show !

बालपण संपलं.
वयामुळे आमचंहि मन मराठवाड्यातनं उडून मुंबईत जाऊन बसलं. त्यामुळे हळदीकुंकवाचे ठिपके जोडतं मराठवाड्यात फिरणं देखील कमी झालं.
पण तरीही माझ्यावर हळदीकुंकू या समारंभाचे जे काही संस्कार झाले व जे अजून निदान आठवणीत तरी शिल्लक आहेत त्याच मोठं श्रेय ह्या मराठवाडी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जातं.
पण अस्मादिक black basalt rock चे बनलेले असल्यामुळे कालौघात हळद-कुंकवाचा पार निचरा झाला पण मला कधीही ही गावं,तेव्हाचे शेजार-पाजरी, संबंधीत परके वाटत नाहीत.Any day, any time I get connected to them.
I feel extremely attached to the entire establishment and its essence.
चला खडकावरच्या कोथिंबीरी सारखं काहीतरी रुजलं आपल्यात.

तर कालच्या मातृदिनाच्या व आजच्या अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने...
आई,मावश्या, काकवा व आत्यांच्या ममतेचा सड्याने शिंपलेलं आयुष्य असंच शितल रहावं व त्यांच्या आठवणींचा सुगंध अक्षय दरवळावा हीच सदिच्छा !

No comments:

Post a Comment