Sunday, 29 March 2015

कोंबडी पळाली...तंगडी धरुन....

रणरण दुपार...
विदर्भातील पुसदमधे प्रवेश करतांच एक ’Hotel Ashoka Return' नावाचा अत्यंत उठवळ धाबा दिसला.
तेथील स्वैपाकाच्या मातीच्या हंड्या बघुन गाडी वळवली...
इथे चहा मिळणार नाही हे माहित असुन देखील चहा आहे का हे विचारत शिरलो...
धंद्याची वेळ त्यामुळे मालक होताचं.
गाडी बघुनंच  मालक "या नं मॆडम...देतो की चहा..बसा..बसा..कुठुन आलात ? ऐ..पक्या...खुर्च्या आनं रे दोन!"
इकडचं-तिकडचं बोलुन मुद्यावर आलो तर हंड्या अमरावती जिल्ह्यातील बहिरमच्या जत्रेत फक्त जानेवारीतचं मिळतात असं कळलं.
मातीची भांडी चुलीवरंच तडकु नये म्हणुन काय curing करतात असं विचारलं तर
गडी जास्तचं आढेवेढे घ्याय लागला.

एवढ्यात बाईकवर दोघंजण आले व येताचं " काय थोरात... काय म्हणताय ? काय खाऊ घालता आज ?"
"बोला...काय घेता ?.. पकडु का?...सांगा कोन्ती पकडु?"
"आहो..निवडा तुमीचं"
"किती जनं आहात ?"
"आमी दोगचं"
"मंग घ्या तो कोंबडा...मस्त हाय...येक किलो भरंल"
"नको दोघचं हाओत...बगा अर्धा किलोचंच!"
"मग त्या बगा कोंबड्या...निवडा येक ! पांडु...चल चुल पेटव"
"अं..अं..द्या ती पांढरी"
"ऐ..सुन्या.. पकड रे ती पांढरी..आन घे आत"
सुन्या लगेच पांढरी कोंबडी पकडायला गेला...
अनुभवाच्या व जिवाच्या भीतीने पांढरी काय सगळ्याच कोंबडया क्वॆक...क्वॆक...करत भर्रर पांगल्या.
मग मालकासह २-३ जणं त्यांच्या मागे धावले...कोंडाळ करुन पकडायचा प्रयत्न करु लागले.
कोंबड्याच त्या! व त्याही मरणाच्या भितीने घाबरलेल्या...
जिव मुठीत/पायात घेऊन धुम सैरावैरा पळु लागल्या...
बर्यापैकी धावपळ व दमछाक..सगळयांचीच...पण एक हाती लागेल तर शपथ !
मालक दमुन..." आरं ये येड्या...कोंबडी कदी तशी गावलं का तुला? त्ये दाने टाक त्यांना...
त्या शिवाय नाय त्या हाती लागायच्या "

आ...आ....आ....
दाणे टाकत परत सगळ्यांनी कोंबड्यांना घेरलं...
त्याही महाचपळ...हुलकावणी देत तुरु तुरु पळाल्या...
व आमच्या डोक्यावरनं भरारा उडुन शेजारच्या मक्याच्या दाट वावरात घुसल्या
व सगळ्याच्या सगळ्या दिसेनाश्या झाल्या.

" आरं तीच्या मायला ! गेल्या का त्या मक्यात?....आरं हुडकारं त्यांना...नायतर त्ये रानबोक्ये न मुंगसं युं संपवतील त्यांना"
"हांव नं राव...या मक्यात का येकदा कोंबडी ग्येली की परत काय नजरेला पडत नाय बगा"

" आले बगा अजुन दोन कष्टंबर...चला आता कोंबडंचं पकडतो"
" ऐ..सुन्या...धर त्याला पट्ट्दीशी...ऐ पांडु...पेटीव चुल ढ्णाणा...गिर्हाईक लागु राह्यलं बगं "
 एक नजर त्या बेफिकीर पण कुर्रेबाज कोंबड्यावर टाकली...व हसत-हसत निघलो.



No comments:

Post a Comment