Sunday, 25 November 2012

आठवण.....


बाई तुम्ही गेलात.....

दवणेबाई तुम्ही गेल्यानंतर तीन दिवसांनी का होईना
फेसबुकवरुन  तुमच्या निधनाची बातमी कर्णोकर्णी झाली....

जुन्या मित्रांबरोबर तुमच्या आठवणींना जिव्हाळ्याने उजाळा दिला....

मी छान लिहीते असं सांगुन एक दोघांनी तुमच्याविषयी लिहायचा आग्रह केला....
(आज मला PETच्या परिक्षेचा अभ्यास करायचा आहे...तरीपण न राहवुन बसलेचं लिहायला!)

....पण खरं सांगु का बाई मला तुम्ही शिकवलेलं फारसं काही आठवतंच नाही....

८,९,१० वीतल्या कविता ...धडे...एकांकिका...नाटयछटा...निबंध...व्याकरण.....
काही म्हणता काही ठोस असं आठवत नाही !
नाही म्हणायला...तुमच्या लकबी...फिक्कट सुती साडया...हिवाळ्यातलं स्लिव्हलेस जॆकेट...तुमचे बुट...
आणि तुमचा कायमचा शांत, संयत व समजुतदार स्वभाव आठवतो.....
नक्कल करायची वेळ आली तर, खुर्चीमागे उभे राहुन डोळे मिटून शिकवायची तुमची नक्कल मी छान करीन.

अरे.. हां... एक मात्र स्पष्ट आठवतं.....एकदा भर वर्गात तुम्ही माझ्या फर्डेदार अक्षराची तारिफ केली होती...
" हिचं अक्षर बघा...चष्म्याशिवाय वाचता येतं !"

पण तुम्हाला म्हणुन सांगते...मी आजही माझं हस्ताक्षर वळणदार होण्यासाठी धडपडते....
व्याकरण सुधारणेस भरपूर वाव असल्यामुळे मनातल्या मनात खंतावते....
दिवाळी अंकातल्या कविता अधाशासारख्या वाचते....
वाचुन  भावलेलं घरातल्यांना आवर्जुन वाचुन दाखवते....
चांगल्या लेखांची कात्रणं जमवुन वंचितांच्या शाळेत देते....
त्यांची लायब्ररी उभी करायचा प्रयत्न करते....
ह्या मुलांना निदान मराठी वाचता तरी यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते....

अजिंठयावर पी एच डी करायचा मानस आहे....
औरंगजेबावर पुस्तक लिहायचं स्वप्न आहे....

अभिमान वाटावा अशी लायब्ररी घरात आहे...
मराठी...ईंग्रजी...धर्म...ईतिहास...भुगोल...कला...राजकीय...सामाजीक...कुठलाही विषय हद्द्पार नाही....
पण एक आता कळलं...माणुसकीपुढे सगळं थिटं !

माझी मुलगी वेचक वाचते...विचार करते...आणी सुरेख लिहीते सुध्दा!
एक छान माणुस बनण्याच्या प्रक्रियेत आहे.....

बाई... कसं म्हणु... तुम्ही शिकवलेलं काहीचं आठवत नाही ?
मी माझे शब्द मागे घेते....आणी शब्दांपलीकडची श्रध्दांजली तुम्हाला अर्पण करते !




1 comment:

  1. Gahiwarun aananare shabda aahet........prashant d

    ReplyDelete