A lot can happen over the demo of कांदेपोहे.
आज रविवार निवांत आहे. लेटिशियाला कांदेपोहे शिकवायचा घाट घातलाय. फोडणीपासून रीतसर शिकवणं चालू आहे. ही शिकवणी चालू असतांनाच काल हजेरी लावलेल्या एका संगीत मैफिलीवर चर्चा सुरु आहे. शंकर बापू आपेगावकरांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेली अग्रणी धृपद गायक पद्मश्री वासिफुद्दीन डागर, पं नाथराव नेरळकरांच गायन व उध्दवबापूंच्या दमदार पखावजची साथ अशी ही मैफिल होती. या एक्स्चेंजच्या मुलांनी ब-यापैकी एंजॉय केली.
तर आज पोहे करताना-शिकवताना परत या मैफिलीविषयी चर्चा झाली. कालच्या मैफिलीत रथसप्तमीचे औचित्य साधून मी वासिफुद्दीन यांना गायत्री मंत्र म्हणायची विनंती केली. त्यांनीही अंगावर रोमांच उभे राहतील अशा धीरगंभीर व खर्जातल्या आवाजात धृपदीय ताना घेत, ओंकार म्हणत अत्यंत सुरेलपणे गायत्रीमंत्र म्हणला.
आमची योगाक्लासमधे पाच ओंकार म्हणताना आवाज बेसुरा होत दमछाक होते. इथे या पट्टीच्या गायकाने तासाभराच्या धृपद गायना नंतर म्हणलेला ओंकारांसहीतचा गायत्रीमंत्र म्हणजे गळ्यावरची आणी श्वासांवरची जबरदस्त हुकमतच होती.
Aai but what is OM ?
मग मला उमजलेली आणि इंग्लिशमधे मांडू शकेल अशी ओमची माहिती तिला दिली.
एकीकडे तडतडणारी मोहरी, परतणा-या मिरच्या-कांदे-बटाटे-मटार आणि इकडे भारतीय गायन कला, तिचं पुर्वीचं आणि आजचं स्वरुप, हिंदू देवतांची महत्ता सांगणारे गीतं, जीव ओतून ती गाणी गाणारे मुस्लिम गायक...एकूणच किती बोलू आणि काय काय सांगू असं झालं मला.
भारतीय गानकलेची थोडीफार माहिती आणि कांदेपोहे करायचे अनुभवी नुख्से सांगत सांगत खमंग पोहे जमले. चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकलेले पोहे गप्पांच्या ओघात कधी संपले कळलही नाही.
अरेच्चा, तरी पोह्यांच्या खमंग आणि खरपूस खरपुडी विषयी सांगायचच राहीलं लेटिशियाला.😁
#RYEanecdotes
No comments:
Post a Comment