Sunday 6 December 2020

फिरस्ते फरिश्ते...

जगरहाटीतल्या संस्कृतीला त्या त्या भौगोलिक प्रदेशाचं, तिथल्या मोसमांचं, तिथल्या समाजाचं आणि काही प्रमाणात ऐतिहासिक परिस्थितीचं पाणी मिळाल्याशिवाय ती संस्कृती बहरतच नाही. अर्थात काळानुरूप त्यातही बदल होतात. तरीसुद्धा विचार केला तर बदललेल्या रुपाची पाळंमुळं आपल्याला खोलवर सापडतात.

हे लिहायचं कारण आत्ताच एका विशिष्ट आवाजात हरमा...ल, हरमा...ल असं ओरडत एक हातगाडीवाला दारावरुन गेला. खरंतर अशा गाडीवरचा प्लास्टिक आणि पत्री फुटकळ माल विकत घेतल्या जायची शक्यता आमच्या गल्लीत मुळीच नाही. पण जवळच कष्टक-यांची वस्ती आहे, त्या गल्ल्यांमधून फिरताना इथुनही एक फेरफटका तो विक्रेता मारत असेल. खूप वेगळी साद आली म्हणून मी जरा चौकसपणे पाहिलं तर हा गाळण्या, चाळण्या, कंगवे, आरसे असलं फुटकळ गोष्टी हातगाडीवर विकणारा होता.

दोन आठवड्यांपूर्वी अशीच एक महिला पातळ स्टिलची अतिशय वैविध्यपूर्ण आकारातली भांडी घेऊन फिरत होती. भांड्यांचे आकार एकदम दक्षिणी टाईप म्हणजे आंध्रा पध्दतीचे. पहाता क्षणीच नजरेत भरावे असे. भांड्यांच्या आकाराच्या मोहात पडून लगेच तिला थांबवून माझ्या दारी ये असं म्हटलं तर बाल है क्या दिदी ? बाल पे ही ते बर्तन मिलेंगे असं म्हणून तिने मला वाटेला लावलं. या वसाहतीत अजूनही केसांच गुंतवळ विकत घेऊन त्या बदल्यात गंगावन किंवा अशी कमनिय आकारातली स्टिलची भांडी विकणारे फिरताहेत हेच नवल आहे.

सहसा तुडुंब पावसाळा असतांना असे फिरते विक्रेते फार कमी दिसतात. पण गणरायाचं आगमन आणि अशा फिरस्त्या विक्रेत्यांचा एक विशिष्ट वर्ग दारोदार फिरुन नेमक्या वस्तू विकायच्या मागे लागतो.
आम्ही रहातो तो ब-यापैकी मॉडर्न व सधन आणि हिंदूचं प्राबल्य असलेला एरिया आहे. पण गेल्या चाळीस वर्षात औरंगाबाद शहरात दिसले नाहीत असे हर त-हेचे विक्रेते इथे हजेरी लावून जात असलेले दिसले.

त्यात आपल्या सारख्या उष्ण कटिबंधातील भारतात, त्यातही आमच्या कोरडेठाण मराठवाड्यात तर हिवाळा म्हणजे अति सुखाचा मोसम. त्यामुळे दिवाळी संपली की या विक्रेत्यांच्या आरोळ्या दिवसभर ऐकायला येतात. बरेचदा या आरोळ्या इतक्या परिचित झालेल्या असतातना की कधी एखादी वेगळी आरोळी ऐकायला आली की लगेच कान टवकारतात आज हा काय विकतोय बरं म्हणून.

गालिचे विकणारे, कपड्यांवर-केसांवर स्टीलची भांडी देणारे, जुन्या कपड्यांच्या सतरंज्या करुन देणारे, सणावारी डेकोरेशन, रांगोळ्या, खोटी फुलं-हार, साचे विकणारे, झाडू-झाडं-कुंड्या विकणारे, लाह्या-मुरमुरे-पापड व इतर वाळवणं विकणारे, ऐन थंडीत डिंक, बदाम, चारोळ्या विकणारे, तिळ-जवस-कारळ-मोहरी विकणारे, भाज्या-फळं विकणारे, घरगुती तुप, मध विकणारे, धार लावणारे, गोधड्या शिवणा-या...काही विचारु नका. सतत कुणी ना कुणी हाकारे देऊनच जातात. 
भर उन्हाळ्यात मुलांना फिरवणारे उंट आणि उंटवाले, बुढ्ढी के बाल, कुल्फीवाले, माठवाले, 
ऐन श्रावण-दिवाळीत पोतराज, वासुदेव, रामदासी, भविष्यवाले, नंदीबैलवाले, कश्मिरी भरतकामी कपडे, कलकत्ता साड्या विकणारे...वगैरे वगैरे. 
म्हणजे बसल्या जागी करमणूकच करुन घ्यायची असेल तर सहज दिवस कलंडू शकतो.

त्यातही गंमत म्हणजे आर्थिक स्तराप्रमाणे, विशिष्ट धर्मांच्या वसाहती प्रमाणे, त्या-त्या ठिकाणच्या हवामानाप्रमाणे देखील हे विक्रेते विविध वस्तू, पदार्थ घेऊन हाकारे देत फिरत असतात. 
आपल्याच औरंगाबादमध्ये मुस्लिम एरियात ब्रेड, पाव, टोस्ट, खारी, अंडी दारोदार जाऊन विकणारे बहुसंख्येने असतात. तर हिंदू वसाहतींमध्ये सणावारी बेल-फुलपुड्या विकणारे प्रामुख्याने फिरतात.

माझी एक इराकी मैत्रिण सांगत होती की इराकमध्ये पोर्टेबल, मुव्हेबल तंदूर घेऊन लोकं गल्ल्यांमधून फिरतात. आपण आपलं भिजवलेलं पीठ दिलं की तिथल्या तिथे खरपूस तंदूर शेकून देतात. दिल्लीतही असे तंदूर-पराठे शेकून देणारे हातगाडीवाले फिरतात म्हणे. वेगवेगळ्या प्रांताचेही काही वैशिष्ट्यपूर्ण विक्रेते असतीलच की. 

मागे पॉंडेचरीला गेले होते. वास्तव्य अगदी एका कोळी पाड्यात होतं. तिथे रोज सकाळी एका बकेटमधे ताजी मासळी विक्रीसाठी घेऊन एक बाई फिरायची. बकेटवर मासे कापायला लाकडी फळी, कोयता आणि वजन करायला छोटा तराजू. रोज ताजे मासे. 
त्या मासेवालीच्याच मागे एकावर एक दोन डाली घेऊन एक फुल विक्रेती यायची. एकात मोगरा, दुसरीत अबोली. दो-यात गुंफलेल्या हारांच्या वेटोळ्यांनी त्या डाली अक्षरशः ओसंडून जात असायच्या. 

अगदी सागर किनारी असलेला टुमदार पाडा, गल्लीतील प्रत्येक झोपडी वजा कौलारु घरासमोर रोज पहाटेच सडा, त्यावर दिन महात्म्याच्या सुरेख हळद-कुंकू वाहिलेल्या अप्रतिम रांगोळ्या, दारांना फुलांची तोरणं आणि गल्लोगल्ली हाळी देत आलेल्या या मासे आणि फूल विक्रेत्या..असं एक अतिशय चैतन्यदायी सुगंधी-दुर्गंधी दृश्य रोज सकाळी पहायला मिळायचं.

तर अशी ही गल्लोगल्ली, दारोदारी जाऊन काहीतरी विक्री करणारी जमात घरबसल्या आपल्याला नकळतपणे रिझवते. तुम्ही भलेही कुठल्याही निराशाजनक मूडमध्ये असाल पण या चुटपुट विक्रेत्यांचे हाकारे तुम्हाला खरोखर आश्वस्त करतात. 
एक उमेद देतात. 
ही अनदेखी पण आवाजी चहलपहलच तुम्हाला एक इंस्टंट उर्जा देते. 

सगळं काही आलबेल आहे, होईल आणि असणारच याची ग्वाहीच देत असल्यासारखे हे अनाम फिरस्ते फरिश्ते गल्लोगल्ली चैतन्य वाटत फिरत असतात.

Saturday 7 November 2020

एक चद्दर..

लेकीने एखादी जुनी चादर throw away साठी मागावी आणि आपल्या निसंगतेचा कस लागावा.
या कोरोनाग्रस्तीच्या काळात कशाचही आक्रितच वाटायलंय.

आई एखादी पातळ पण पक्की डबलबेडची टाकावू चादर देतेस का ?
बघते हं.
घरामधे ह्या ढीगभर चादरी. चढत्या भाजणीच्या क्रमाने जुने-या, टाकावू झालेल्या. पण एक देखील चादर या क्षणी देऊन टाकण्या योग्य वाटेना.
या आठ-दहा नवसर चादरी तर वापरातल्याच आहेत. आणि यंदा तर दिवाळीतली हॅन्डलूम्सची प्रदर्शनही यायची शक्यता नाहीये. ठेवा बरं सांभाळून सटीकपणे आपल्या चादरी.

मग जुन्या आणि काही वर्षांच्या स्टॉक मधल्या चादरींमधल्या गठ्ठ्यामधल्या चादरी भराभर नजरेखालून घातल्या तर
ही काय सुंदर ब्लॉक प्रिंटची आहे...नक्कोच काढायला.
ती काय फिक्कट रंगाची गहु-पापड वगैरे वाळवायला वेळप्रसंगी कामी येईल...
ही तर भलतीच पाणी एॅबसॉर्बंट आहे, जास्तीची भांडी-कुंडी धुतली की बरी येते भांडी पसरवून वाळवायला...
ती तर इस्त्रीच्या टेबलासाठी फारच चपखल आहे...
हिचे काय सुरेख हात-पाय पुसणी होतील...
तिला काय हिरण्यच्या धबडग्यात पाठवून देता येईल...
हिचा वापर गोधडीसाठी करता येईल...
त्या पातळ चादरीचा ब्रशेस-रंग पुसायला बरा उपयोग होईल...
अरारा..रा....रा ! 
हि-ती, हिचं असं-तिचं तस्सं असं करता करता एकही चादर देऊन टाकण्या योग्य सापडेना वा वाटेना.

कस्काय व्हायचं आपलं ? 
एवढ्या पंधरा-वीस वापरातल्या चादरीतंन एक चादर आपल्या हातून येनकेन कारणे सुटेना आणि आपण संसार त्याग कसला डोंबलाचा करणार ? 
हा सोंसार म्हणजे खरंच जालीम मोहमाया आहे. 
साठी जवळ याय लागलीयै.
साठी नंतर वानप्रस्थाश्रम अस्तोय म्हणे. आणि आपला तर अजूनही एकेका चादरीत गृहस्थाश्रमी जीव अडकलेला.
परमेश्वरा तुच आहेस रे बघायला आणि हा गुंता सोडवायला देखील.

Wednesday 7 October 2020

रक्तचंदनी बाहुली....

कुठेही मुका मार बसला, मसल दुखावला गेला, रक्त साकळलं की रक्त चंदन आणि आंबेहळद सहाणेवर उगाळून घ्यायची. ते मिश्रण एखाद्या पळीत तापवायचं आणि सोसवेल इतकं गरम असतानाच दुखावलेल्या जागी लावायचं. सकाळ-संध्याकाळ हा लेप लावून ठेवावा. दुखण्याच्या तीव्रतेनुसार दोन चार दिवसात बरं वाटतं. 
तर काल सहाणेवर आंबेहळद आणि रक्तचंदनाची बाहुली उगाळत होते. कमरेवर हात ठेवलेल्या रखुमाई सारखी ही एकसंध गडद मरुन कलरची रक्तचंदनाच्या लाकडाची बाहुली बहुदा जत्रेतून किंवा दवासाजच्या दुकानात मिळत असावी. 
माझ्या आयुष्यातील पहिली सहा सात इंची तब्येतदार अशी बाहुली मी माझ्या पायातून अपंग होऊन आयुष्यातली निदान दहा बारा वर्ष एकाजागी बसून, फरकत फरकत जुजबी वैयक्तिक कामं करणा-या आणि बहुतांशपणे परावलंबी झालेल्या माझ्या आजीच्या (आईची आई) संदूकीत पाहिली होती. 'संदूक' हा माझ्या या आजीचाच खास शब्द. हा शब्द जरी कानावर आला तरी तब्येतीपुढे अगतिक होऊन हाताशी-उशाशी असलेल्या या एका पत्री कुलूपबंद संदूकीत तिला बहुमुल्य वाटणारा संसार वा ऐवज जपणारी आजीच आठवते. 
लहान वयात ती लाकडी ठोबळ बाहुली, बाहुली म्हणूनच आवडली होती. पण आपली पत्नी पायाने ठणठणीत होऊन निदान माफकपणे तरी स्वावलंबी व्हावी यासाठी माझ्या निसर्गोपचार प्रेमी आजोबांनी वृध्दपकाळातही जंग जंग पछाडून जे सगळे उपचार तिच्या साठी केले होते त्यातला एक उपचार या भक्कम रक्तचंदनी बाहुलीचाही असावा अशी मला खात्री आहे.

ही माझ्या घरात असलेली बोटभर उंचीची रक्तचंदनी बाहुली. कुठे घेतली आता आठवत नाही. 
मागच्या वर्षी शहरातल्या खादीभांडारातून एक लहानखोरा रक्तचंदनी ब्लॉकही घेतलाय. भरपूर किंमत मोजून. प्रश्न किमतीचा नाहीये पण अजूनही खादीभांडारसारख्या संस्था महागड्या का वाटत नाहीत, पण खरेपणाची, अस्सलपणाची ग्वाही देत ग्राहकांना डोळे मिटून खरेदी करायला उद्युक्त करु शकताहेत हीच गोष्ट लाखमोलाची आहे.

तर सहाणेवर एखादा जिन्नस उगाळणं आणि अतिशय फाईन पावडर करणं यातही बराच फरक असतो. कुणी आयुर्वेदाचार्य यावर प्रकाश टाकू शकतील. उगाळणं म्हणजे घर्षणातून फाईनेस्ट पार्टिकल्स होणं असं असावं कदाचित. म्हणूनच बाळगुटी नेहमी उगाळून देतात. बाळगुटीची रेडीमेड पावडर मी तरी आजतागायत पाहिली नाही.
तर ते असो. 
सहाणेवर जोर लावून एखादी गोष्ट-जिन्नस उगाळणे, उगाळताना सहाणेवर त्या उगाळलेल्या पेस्टमधेच नागमंडलासारखे फॉर्मस तयार होताना, घट्टसर होत जाताना बघणं, त्या जिन्नसाचा रंग सहाणेवर उतरणे, आसपास त्या जिन्नसाचा दरवळ पसरणे या सर्व गोष्टी हल्ली मला फार मेडिटेटिव्ह वाटतात. एखादी गोष्ट एकाच दिशेने उगाळतांना आपले विचार मात्र अष्टदिशांनी फिरुन येतात. 
एखाद्या व्यक्तीला त्याच त्या गोष्टी फिरवून सांगायची सवय असली की ती व्यक्ती गोष्टी उगाळतो असं आपण म्हणतो. विशेषतः प्रौढ गृहिणी-महिलांच्या बोलण्याला हे उगाळण्याचं लेबल सहसा पुरुषप्रधानतेतून फार लावलं जातं.
मध्यमवयातील या महिलांच्या या मानसिकतेच, सवयीचं हसही केलं जातं. दुर्दैवाने जुन्याच गोष्टी या वयात इतक्या बारकाव्याने, तडफेने का उगाळल्या जाताहेत या कळीच्या मुद्द्यापर्यंत कोणीच पोहंचायचे कष्ट घेत नाही. हसीं मज़ाक मधे सगळं साचलेले, तुंबलेलं रफ़ा दफ़ा होऊन जातं, केलं जातं.

हं तर काय सांगत होते ? 
रक्तचंदनी बाहुली !

प्राचीन काळापासूनच सहाणेवर उगाळायला रक्तचंदनी बाहुला न बनवता बाहुलीच बनवली आहे हे किती समर्पक आहे ना ?
उगाळायला, झिजायला आणि आरोग्यही नीट करायला बाईचं किंवा बाईचच रुप लागतं, वा चर्चेत रंग भरायला बाईचच नाव उगाळावं लागतं.

सदियोंसे जमाना काफी समझदार है !

Tuesday 8 September 2020

चक्कू...छुरिया...तेज करालो...

चक्कू..छुरिया...तेज करालो...

So Aai let's have sauteed veggies for dinner.
आता असं लेकीने म्हटलं की आपली गत इकडे आड तिकडे विहीर अशी होते. एक तर लेक उत्साहाने स्वैपाकघरात खुडबुडतीये याचं कवतिक करावं की ते सॉते्ड व्हेजीज म्हणजे समोर नक्की काय वाढण येणारे याची धास्ती घ्यावी. पण अस्मादिक समंजस आई असल्यामुळे सॉते्ड तर सॉते्ड म्हणत खुले दिलसे होकार दिला. 
पण मग एकूणच रागरंग बघता मनात म्हटलं या सॉते्डचा एग्झाक्टली अर्थ तरी काय बरं ? आधीच इंग्रजी म्हटलं की आपल्या काळजाचा ठोका चुकतो त्यात नेक्स्ट जनरेशनने सॉते्ड व्हेजीज करायला हातात चाकू घेतलाय म्हटल्यावर तर विचारायलाच नको. 
म्हटलं उगा रातच्या पारी भडका भडकी नको. आपल्याला फक्त सोते हुवे ही हिंदी शब्द रचना वा गेलाबाजार सौतन हेच शब्द माहिती होते. 
पण म्हटलंना अस्मादिकांना आपल्या इंग्रजीचा लई म्हणजे लईच कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे कुठ्ठं काही इंग्रजीचं खुट्टं वाजलं की अस्मादिक मोबाईलमधली डिक्शनरी पिंजूनच काढतात. 
एक बहोत पुरानी आदत है ये अपनी. 
आज तर काय आयताच सॉते्ड खुराक मिळणार होता. बसले डिक्शनरी पिंजत.

आई...घरात एकही चांगला चाकू नाहिये का ? I don't know how do you manage with these knives ? तुला ऑन लाईन चाकूंचा सेट मागवून देऊ का ? हे असले चाकू पाहिले की मुडच जातो भाज्या कापायचा.
आता लेकीला काय सांगू ? घरात एक जुन्या पद्धतीची विळी, अंजली कटर, दोन-तीन काम चलावू चाकू, दोन बडे चाकू एवढा ऐवज असतांना देखील कशाला अजून नवीन चाकू हवेत ? आणि भाजी कापण्याचं कौशल्य त्या चाकूत नसून आपल्या हातात असतं हेही लेकीला कसं पटवून देऊ ? आणि चांगली धार असलेल्या अंजली कटर वर अतिशय उत्तम प्रकारे भाजी कापण्यात अस्मादिक माहिर आहेत हेही तिला कसं सांगू ? कुठल्याही चाकूने उत्तम भाजी कापू शकण्याच्या स्वत:च्या कौशल्यावर व घराघरातनं विविध प्रकारचे  चाकू, कटर्स, श्रेडर्स, चॉपर्स गठ्ठ्याने बाळगणा-यांच्या अतिरेकी श्रीमंती हौसेवर आपल्या मिडल क्लास मातेने हे थोरले लेख फेसबुकवर लिहून लोकप्रियता मिळवली आहे हे या पोरीला कधी कळेल आता ?
....अगं धार गेलीये सगळ्यांची म्हणजे... चाकूंचीच हं.
जातेच आता गावातल्या धारवाल्याकडे किंवा तो दारावर येणारा धारवालाही हल्ली येतोय का ते बघते.

Oh Aai...what a long term program. आपलं काम आत्ता अडलंयना ? You don't know how good knives work. These चाकूज are so irritating. You start using good chakus, then you will realise what I mean. मागवू का ऑनलाईन ? 
...As long as तुझ्या अकाऊंटवरनं मागवणार असशिल तर माझी काही हरकत नाही. Otherwise I am happy with my vilis and cutters and knives.
Aaaiii.....
एकुणच भाज्या चिरता चिरता चाकूला आणि सं'वादालाही धार लागत होती. म्हटलं आता फार ताणायला नको. नसता आसपासचे सगळेच धारी-बिनधारी चाकू वापरात आले असते.

तर ही अशी अस्ते बरं जनरेशन ग्याप. 
फक्त धर्मबाह्य प्रेमसंबंध, जातीबाह्य लग्नसंबंध, परकिय भाषाप्रेम, परदेशागमन, मोदी-राहूल असल्या शेलकी मुद्यांवरच जनरेशन ग्याप गुद्यांवर येत नसते. 
या जनरेशन ग्यापला भलतेच अलवार वा धारधार पापुद्रे असतात ते असे. 
ते ज्याचे त्यालाच कळतात आणि सलतात बरे.

Sunday 23 August 2020

यत्र, तत्र, सर्वत्र...

यंदाचा भरपूर पाऊस, नुकताच होऊन गेलेला पोळा आणि येऊ घातलेले गणपती. ग्रामीण भागातल्या आमच्या काही स्टाफचा बुट्टी मारायचा मोसम. त्यात आज पाण्याची मोटार बिघडली. म्हणजे पाणीच पाणी चहुकडे पण नळाचे पाणी गेले कुणीकडे ? अशी गमतीदार गत सकाळीसच झालेली. 
थोडक्यात या गोंधळात पहिली विकेट योगासनांची पडली. पाणी, ही मोटर, ती मोटर असं दोघा तिघांशी बोलताना सुनित म्हणाला अगं...उद्या गणपती आहेत. अमक्याचा आत्ताच फोन आला म्हणून कळलं. नसता आपल्याला इथे काहीच कळलं नसतं.
यस्स, खरंय इथे काहीच कळत नाही पण मला माहिती आहे उद्या गणपती आहेत म्हणून. But I am happy that we are far away from this. It's good that I am in nature and forgotten about city life and धुमधडाकी फेस्टिवल्स. 

खरंच, खूप छान वाटतंय या इथल्या निसर्गात एखाद्या फुलपाखरासारखं, चिमणीसारखं, घारीसारखं, मासोळीसारखं होत, कुठलंही मानवनिर्मित सामाजिक, सांस्कृतिक अवडंबर माजवलेलं सणावारांच कॅलेंडर घटकाभर विसरून निसर्गातच रममाण होताना. 
I feel I am more wholeheartedly connected to nature and almighty now. 
NATURE, with all its ups and downs, it's seasons, it's cosmic connection and it's relevance also is a great and soulful experience to have. 
To be in nature is itself a blessing.
Nature...the eternal guiding force to humans.

म्हणजे मला सणावारांच कौतुक नाहिये असंही नाही, but forget this recent lockdown phase, पण हल्लीच सणावारांच सार्वजनिक आणि घरगुती स्तरांवरचं   भपकेबाज साजरीकरण बघीतलं की, व्यापारपेठांचे त्या निमित्तानाचे तेल ओतू उद्योग पाहिले की अक्षरशः उबग येतो. त्यात या सोशल मिडियाने सगळ्या जगण्याचाच पोरखेळ करुन टाकलाय. आणि या लॉक डाऊन फेजमधे तर ऊत आलाय सगळ्याचाच. 
म्हणजे शतकानुशतके थापलेल्या शेंदूरामुळे जशी देवाची शिल्पीत मुर्ती तिची मुळ रेखीव रुपरेखा हरवून बसते तसंच काहीसं या व्यापारीकरण आणि सोशल मिडियाच्या संयोगाने आपल्या पारंपरिक सणांचं झालेलं आहे. म्हणजे कालानुरूप सगळ्याच गोष्टी कात टाकतात, पण सद्य परिस्थितीतले हे सण, त्यांच घरोघरचं-सामाजिक साजरीकरण, त्यांच सोशलमिडियावरचं सादरीकरण, खानपानाच्या फोटूपंगती, रंगरंगोटी-झगमगाट अक्षरशः कुणालाही अनाकलनीय वाटावेत इतके अमुलाग्रपणे बदलले आहेत.

हं, तर गंमत म्हणजे यजमानां बरोबर जरी मी गणपती उत्सव विसरल्याची री ओढली असली तरी मी येऊ घातलेला गणेशोत्सव विसरलेली नाहीये. 
हा अहोरात्र अग्निहोत्रासारखा चालणारा सोशल मिडिया विसरुच देत नाही तुम्हाला तुमच्या परंपरा, सण-उत्सव, कर्तव्य, राष्ट्राभिमान सारख्या जगण्याचं पोटमूळ असलेल्या गोष्टींना. सांस्कृतिक जगण्यातली, धार्मिकतेतली, वैयक्तिक उत्सवातील प्रत्येकच गोष्ट सोशल मिडियातून इतकी सातत्याने समोर आली पाहिजे का ? 

महाराष्ट्रातील चकल्या, लाडू, पूरणपोळ्या आणि एवढ्यातल्याच करंज्या आणि मोदकांचा तर कधीपासूनच पाऊस पडतोय या सोशल मिडियांवरनं. 
बापरे !
हाताने बनवलेल्या गणेश मुर्ती-सजावट-मोदक-जेवणा बरोबरच ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या गणेश मूर्ती-सजावटी-मोदकं-जेवणांचे पदार्थ, परत हे सगळं घरच्याघरी करायला शिकवणारे ऑनलाईन क्लासेस, रेडी टू युज, डू इट युवरसेल्फचे पॅकेट्स...
अरे...किती हा बाजारुपणा. अगदी खरंय कोरोना पॅनडेमिकने फार मोठं आव्हान सगळ्यांपूढे उभं केलंय. एकमेकांच्या मदतीने सावरण्याशिवाय पर्याय नाहीये तरी पण इतकाही अतिरेक करायची गरज आहे का ?

मोदक..मोदक...मोदकं. 
अरे किती प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज एका व्यक्तीच्या तळहातावर ठेवणार आहात ?
ओल्या-कोरड्या सारणाचे, गुळ-साखरेचे, तळलेले-उकडलेले मोदक, खव्याचे मोदक, ड्रायफ्रुटसचे मोदक, गुलकंदाचे मोदक, खजूराचे मोदक, 
पेढ्यांचे मोदक...मोदक....आणि मोदकंच. 
माझा तर मोबाईल उघडलाकी फक्त मोदक, गणेशमुर्ती, सजावट, आरत्या, येऊ घातलेल्या गौरींची सजावट, कुळाचारी स्वैपाक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आठवणींच्या त्याच विषयाला धरुन असलेल्या पोष्टींच एक कतारसे दाखवतोय. 
खरोखर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सोशलमिडियावरनं वरील प्रकारच्या ढगफुटीचा अनुभव मला तरी येतोय बुवा. बरेचदा या झिम्माडीत आपल्याला हवं असलेलं, चांगलही काहीतरी हरवून जात आहे असंही वाटतंय.
कदाचित कुणाला हे खटकेल पण सणावारीच्या खाद्यपदार्थांच्या पोष्टी बघूनच मला अजिर्ण झालंय.

कुणाच्याही श्रध्देविषयी वाद नाही, दुमत नाही. कुठल्या दैवतावर श्रध्दा ठेवावी, त्या दैवताच्या सणाचं सादरीकरण कसं करावं हा ज्याच्या त्याच्या अंतर्मनाचा, कुटुंबातील रीतींचा प्रश्न आहे पण या दैवतांची उपासना करतानाचा हा जो सर्वदूर पोहोचविणारा, सर्वसमावेशक डिजिटल राईट टू पब्लिशचा आविष्कार आहेना त्याला जरा आवरतं घेत गणेशोत्सव वा इतरही सण-उत्सव जरा सबूरीने घ्यावेत असं मला वाटतं. 
एखाद्या दैवताची मनोमन उपासना करण्यासाठी असलेल्या सणांचं रुप देखील नक्कीच काळानूरुप इव्हॉल्व्ह होत असतं. पण म्हणून का त्या आंतरीक बळ देणा-या उपासनेलाच बाजूला हटवून बाकीच्याच गोष्टींचं अवडंबर माजवायचं ?
एवढ्यातल्या या सोशल मिडियाने जळी स्थळी काष्ठी पाषाणी वास असणा-या या ईश्वराला मात्र आपल्या मनमौजीने यत्र, तत्र सर्वत्र करुन या सणाचा व ओघानेच श्रध्देचा भुतो न भविष्यती असा बाजार मांडलाय असं वाटतंय.
🌺

Wednesday 19 August 2020

सुखाचे धागे...

सुखाचे धागे...

छान पाऊस. मस्त हवा. संततधार पावसाच्या निमित्ताने मातीकाम करणा-या स्टाफने पण बुट्टी मारलेली. 
सो मलाही काही काम नाही. खोलीतही बसवत नाही आणि झिम्माड पावसात फिरवतही नाही. चक्क रेस्टॉरंट मधे भरतकामाचं काम घेऊन बसले.

तीनेक वर्षांपूर्वी हॅन्डलूमच्या प्रदर्शनातून घेतलेलं टसरचं कापड आणि ओढणी. कुर्ता शिवूनही दोन वर्ष झालेत. या कुर्त्यावर न भरतकाम केलं, ना शिवला तसा हा कुर्ता घातला पण. शेवटी या लॉक डाऊनच्या काळात या कुर्त्या-ओढणीवर मेहरनजर पडली आणि या झिम्माडी मधे अस्मादिकांच्या सिध्दहस्ताची मोहर या ओढणीवर उमटली.

तशीही मी फार वैविध्यपूर्ण आणि मोठं मोठे डिझाईन्स छापून आणणे आणि मग बारकाव्याचं किचकट भरतकाम करणे या विचारांची नाही. प्लेन वा अंगच्याच रेषा वा चौकडी वा माफक फुलं पानं असलेले माझे कपडे असतात. त्यात परत शिवतांनाही जरा रेषा-चौकोन-गोल-डिझाईनचा भरतकामा योग्यतेने विचार करुनच ड्रेस शिवून घेते. त्यामुळे ड्रेस-कुर्ता शिवून आला की भरतकामासाठी म्हणून बाजूलाच पडतो. जशी मर्जी असेल आणि वेळ मिळेल तसा या वेटिंग लिस्टमधल्या कपड्यांचा नंबर लागतो. 
या काळ काम वेगाने माझ्याकडे कधीही चार दोन कुर्ते भरतकामासाठी म्हणून वेटिंगमधे तयार असतातच. तशीच ती रंगबिरंगी रेशमंही काही डझनांनी उपलब्ध असतात, आणि सुया देखील पंचवीस तीस आरामात घरात पहुडलेल्या असतात.
त्यामुळे साहित्य नाही म्हणून काम अडत नाही. तरी देखील कधीतरी एका ठराविक रंगाच्या रेशमासाठी अडतंच, पण त्याही साठी उठसूट बाजार गाठायला मला काही वाटत नाही.

तर सध्या या खादीसारख्या गाठीदार अदरबदर दो-यांनी विणलेल्या टसर सिल्क ओढणीचा नंबर लागला आहे. खरंतर कुडत्यावरच भरतकाम करायचं होतं. पण हल्ली जरा आपल्या पश्चात मुलीला-सुनेला आपले दिलोदिमागसे केलेल्या भरतकामाचे कपडे जावेत, त्यांनी ते जपून वापरावेत, जपावेत असं फार वाटतं. त्यातही आपणच भरतकाम केलेलं असेल्यामुळे आपलही जरा पसाभर काळीज त्या कपड्यांवर नक्षीच्या रुपाने विखूरलेलं असतंचना. आपला हा वारसा कृतीने जरी नसला तरी रुपाने तरी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावा असं खरोखरंच वाटतं. तर सगळा सारासार विचार करता सध्या या ओढणीचा नंबर लागला आहे.

भरतकामाचही तंत्र असतं. ज्या कापडावर भरत काम करायचं त्या कपड्याची घट्ट आणि सैलसर वीण, वार्प(लांबीतले उभे धागे) आणि वेफ्ट (रुंदीतले आडवे धागे)साठी वापरलेल्या धाग्यांची जाडी, प्रत, सुतांची संख्या वगैरे अशा ब-याच गोष्टी असतात. टेक्स्टाईलच्या भाषेत याला प्रत्येकी इंचातला काऊंट म्हणतात. जितका धागा बारीक आणि घट्ट विणलेला म्हणजे जास्त काऊंटचा कपडा असेल तितकं बारकाईने सफाईदार भरतकाम करता येतं. विशविशीत विणीच्या व गाठीदार आडवे धागे असलेल्या कापडावर भरतकाम करणं अवघड असतं. काही लिमिटेशन्स येतात. या ओढणीला तेच झालं.

नागपूर जिल्ह्यात टसरचं विणकाम करणा-या ब-याच सोसायट्या आहेत. औरंगाबादला दर दिवाळीत इंद्रायणी नामक प्रदर्शन घेऊन ही मंडळी येत असतात. पण हल्लीची महागाई, पॉवरलूमसारखी सफाईदार-चटपटीत कापडं निर्माण करायची या सोसायट्यांची असमर्थता आणि हॅन्डलूम सिल्कला जनतेचा आर्थिक वरदहस्त न मिळणं त्यामुळे दरवर्षी या कापड निर्मितीला खिळ बसत चालली आहे. तरी देखील विणाईमधे थोडेफार बदल करुन, उभे-आडवे दोरे कमीप्रतीचे वापरुन, इंचातला उभ्या-आडव्या दो-यांचा काऊंट कमी करुन, काटकसर करत या सोसायट्यांमधे अजून तरी धुगधुगी आहे. हं, तर सांगायचा मुद्दा, या लॉकडाऊनच्या काळात मी बरीच नेटसॅव्ही झाले आहे. वेळ आहे. ऑनलाईन भरतकामाचं बरंच काही बघत-शोधत बसते. So I was very much inspired to do elaborate kantha work on this silk chunari. कांथा काम जर खरोखरच सफाईने केलं तर तो भरतकाम केलेला कपडा दोन्ही बाजूंनी वापरता येतो. आणि माझी ही तर ओढणीच होती. So I was determined to use kantha stitch.

ओढणीवर कमी-अधीक जाडीचे वेफ्टधागे वापरुन अंगचेच पट्टे तयार होते. त्या पट्ट्यांचा आधार घेत सरसर धावदोरे घातले. ( रेशमांच्या दोन-चार लडी कमी पडल्यामुळे सटीकपणे मध्यंतरी तोही बाजार करुन आले होते) मधल्या इंचभरच्या पट्ट्यात कांथा स्टिचमधेच पण फूलं-पानं करायचा बेत होता. पण हाय. सिल्कचे धागे कमी वापरुन ही टसरची कापडं स्वस्त करायच्या नादात विणकरांचा वार्प आणि वेफ्टचा असमान काऊंट बघता ही ओढणी अशाप्रकारच्या नजाकती भरतकामाला योग्य नव्हती. लांबीतले धागे अतिशय बारीक आणि बहुदा सिंथेटिक असावेत. पण रुंदीतले आडवे धागे (वेफ्ट) मात्र टसर रेशमाचेच आहेत. पण ते धागे जरा कमी सफाईने पिळे मारलेले आणि कमी-जास्त जाडीचे गाठीदार धागे आहेत. खादीसारखे. बघता क्षणी कापड उत्तमच दिसतंय. उलट पट्टेदार अदरबदर धाग्यांमुळे एक छानसा खादीसारखा आदबशीर फिल आला आहे. बारीक आणि आदरबदर आडव्या धाग्यांमुळेच एकाच रंगात दोन शेडचा आलेला लूक, काळ्या रंगाची करवती वा टेंपल बॉर्डर असलेली  ही ओढणी दिसते खूप छान, अंगावर घ्यायला पण छान वाटते. पण हल्लीच्या महागाईच्या काळात या विणकरांच्या सोसायट्यांना लागलेली घरघर बघून विणकरांनी धाग्यांमधे केलेल्या या वार्पमधल्या चोर बदलांमुळे मला माझ्या कांथा कामाला आवर घालून त्यातल्या त्यात वरच्यावर दोरे ठळकपणे राहतील अशा टाक्यांची निवड करावी लागली. कारण इतक्या असमान जाडीच्या आणि विरळ विणीच्या कपड्यावर अतिशय बारकाईचं भरतकाम करणं मला तरी अशक्य होतं. त्यामुळे त्यातल्या त्यात मला सुटसुटीत वाटेल असा फंडा मी राबवला. ऍक्च्युयली मला जसं हवं होतं तसं भरतकाम या कापडावर मी मुळीच करु शकत नाहीये, वा जे करत आहे ते फारसं आकर्षकही दिसत नाहीये. पण हातात काम घेतलंय, आता पुर्ण करायलाच हवं.

पण हा अनुभव घेताना मी आपल्या पुर्वज कलाकारांसमोर अजूनच नतमस्तक झाले. औरस चौरस भारतात भरतकामाचे इतके नमुने, प्रकार आणि वैविध्य आहे की एकेकाचे मासले बघूनच आपण थक्क होतो.
पण त्याही पेक्षा जास्त वैविध्य कपड्यांच्या विणींमधे आहे. सुती आणि रेशमी कापडं हे भारताचे कापड उद्योगातले बालेकिल्ले. कापसाला पिकवायला योग्य असलेली विस्तिर्ण जमीन आणि सुती कापडंच वापरायला योग्य असलेलं उष्ण हवामान. अक्षरशः प्रांतोप्रांती सुती-रेशमी कापडं आपापल्या वकूबाने बनवायचे लघू उद्योग कार्यरत अाहेत. तसेच आपापल्या प्रांतातल्या कपड्यांचा उपयोग जाणून घेत, त्या कपड्यांच्या सुताचा, विणीचा अभ्यास करुन वैविध्यपूर्ण रितीने त्या कापडांवर छपाईच्या, भरतकामाच्या कलाकृतींची मोहर आपल्याच ग्रामीण जनतेने प्राचीन काळापासून इतकी चपखलपणे उठवली आहे की आपण हा बावनकशी कलाबुतीचा पसारा बघूनच थक्क होतो. प्रत्येक टाका, छपाईची पध्दत आत्मसात करताना उपलब्ध कापडाला, त्याच्या उपयोगाला पुर्णांशाने जाणूनच या कलाकारांनी त्या त्या कलाप्रकाराला, कारागिरीला एका चरम बिंदूला नेऊन ठेवलंय. मग तो सिंधी टाका, कर्नाटकी कशीदा, कांथा, कश्मिरी टाका, आरसेकाम असो वा छपाईचं कूठलही तंत्र असो. It's a perfect amalgamation of art and materials.
  
आता माझ्या विषयाकडे वळू. कापडाचं पोत आणि उपयोग बघून त्या त्या प्रकारचं भरतकाम त्या कपड्यांवर करण्यात आपले पुर्वज तरबेज होते. आपल्या पुर्वजांच विणीचं ज्ञान आणि त्या विणीला सुयोग्य ठरेल अशा भरतकामातल्या टाक्यांचा वापर करणं, सुयोग्य टाक्यांचा शोध लावणं पाहिलं की मी अचंबित होते. 
आज एकविसाव्या शतकात मी ज्या कारणासाठी अडखळले त्या अडचणींवर आपल्या पुर्वजांनी कधीच मात केली आहे. विशविशीत कापडावर कशा पध्दतीचं भरतकाम होऊ शकतं हे भरतकाम करणाराच काय, कापड शिवणारा देखील छातीठोकपणे सांगू शकतो. इतका नजदिकी सहवास असल्यामुळे ही जाणकार मंडळी नजरेनी, स्पर्शानेच कापड जोखून सल्ला देऊ शकतात. तर आपल्या या भरतकामातल्या टाईम टेस्टेड शहाणपणा मुळे मी पुन्हा एकदा भारुन गेले आहे.

भरतकाम हा विषय माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. भरतकाम करणं म्हणजे स्वत:साठी ताना घेत सुरेल गाणं गुणगुणणं. 
Nothing more !

कालंच जगप्रसिद्ध भारतीय रॉक गायिका उषा उथ्थुप यांचा गुफ्तगु मधला इंटरव्ह्यु ऐकत-बघत होते. गाण्या नंतर बाईंचं दुसरं पॅशन कोणतं असेल तर सलवार कमीज शिवायचं. आता बोला ?

So three cheers for the community !

Monday 10 August 2020

सम्झौता....

खळाळत्या प्रवाहात ती अचानकपणे पण सहेतुकच पडली वा तिला पाडलं गेलं. बेसावधपणे पडल्यामुळे ती हडबडली आणि तिच्या हडबडण्याने आसपास आगंतूक बरेच चटोर तरंग उठले. 
अखंड आणि अव्याहत वाहणारा प्रवाहच तो. कुठे उंचावरुन, कुठे खाच खळग्यातून, कुठे रेताडा-माताडा-खडकातून. कुठे ढकलून दिल्यासारखा धपकन पडणारा, कुठे वळणाला कवेत घेत संथ होणारा तर कधी लेकरांसारखा खळखळणारा तर कधी घमासानी भोव-याचं रुप घेणारा प्रवाह. 
या अशा चपळ प्रवाहात ती अवचितपणे सापडली. पडता क्षणी भेलकांडली पण मग लगेचच सावरली. पण एकाबाजूने येणारा खळाळता प्रवाह तिला सुधरु देईना. तोल सांभाळता सांभाळता ती पूढे खेचली गेली. पण पुढच्या घमासानी भोव-यात स्वत:ला सांभाळणं तर तिला मुळीच जमेना. दोन-तीन वेळा तर बुडाली, गेली असं वाटावं अशीच परिस्थिती झाली. खाली वर येत, नाकातोंडात पाणी जात ती हताशपणे त्या भोव-याच्या स्वाधीन होऊन गोल गोल फिरत राहिली. नाका तोंडात पाणी जाऊन जगते का मरते अशी अवस्था होत अर्निबंधपणे ती बराच वेळ गिरकत राहिली. 
मग परत  त्या खळाळत्या प्रवाहाची एक संयत लाट आली आणि हिची त्या जीवघेण्या भोव-यातून सुटका झाली आणि थोडीशी सुरक्षित अशी ती काठाकाठाने प्रवाहीत झाली. पण तो प्रवाह म्हणजे अविरत, अखंडपणे परिक्षा बघणारा देवच जणू. खडकावर आपटून परत एक उन्मादी लाट ती जिथे होती तिथे थडकली आणि परत तिला त्या धसमुसळ्या प्रवाहात खेचत घेऊन गेली. आता भोव-यातल्या तरु किंवा मरु सारख्या तुफानी गिरक्या नव्हत्या पण चार हात पुढे तर दोन हात मागे या गतीने तिचा पेंड्युलम झाला. खरंतर या प्रवाहातलं दूरवरच असं शांत व अंतिम ठिकाण तिला खुणावतंय. तिची पण धडपड त्या सुनियोजित प्रवासात सामिल होत त्या अंतिम स्थळी पोहंचायचीच आहे, पण हा मधला धुमश्चक्री प्रवाह तिला तिच्या इच्छित स्थळी मनाजोग्या पध्दतीने पोहोचू देत नाहिये. ती हतबल झालीये या धसमुसळ्या प्रवाहा पुढे. ती अगतिक झाली आहे या बेलगाम वहावल्या जाण्या मुळे.

आता तिने असहाय्यपणे पांढरं निशाण फडकवल्यासारखं त्या प्रवाहामधे स्वतःला समर्पित करुन टाकलयं. आता ना त्या भव-यांच्या गर्ततेची चिंता ना त्या परिणाम शून्य हेलपाट्यांचा त्रागा. अंगावर थडकणा-या प्रवाहाला अंगोपांगी झेलत ती स्वत:च प्रवाहाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करणं, स्वतःच संरक्षण करणं, समोरच्याला धुळ चारणं, विरोध मोडून काढणं या सगळ्या युध्द सदृश्य गोष्टींचा निकाल लागला आहे. प्रवाहाशी तह केल्यामुळे आता ती अतिशय समंजसपणे आला क्षण झेलत, त्या प्रवाहाचं बोट राजीखूशीने पकडत तिच्या गंतव्य ठिकाणी प्रस्थान करत आहे.
शुभम् भवतू !

गोंधळलात ना ?
काही नाही हो, श्रावणी सोमवारचा दमदार व्यायाम झालायै. खोली साफ करायला हाऊस किपिंगचा मुलगा आलाय. मी व्यायामानंतरचा फलाहार म्हणून केळ खात गॅलरीत उभी आहे.  खालच्या प्रवाहाचा जोर आजमावण्यासाठी केळ्याची साल नेम धरुन पाण्यात टाकली आहे. खालच्या खळाळत्या प्रवाहातलं त्या सालीचं भरकटणं, भेलकांडणं, प्रवाहित होणं बघून हे लिखाण सुचलं हो...बाकी काही नाही.
हॅप्पी मंडे !!